Type Here to Get Search Results !

रायगड किल्ला महाराष्ट्राची शान - संपूर्ण माहिती



दुर्ग दुर्गेश्वर रायगड !!!!

रायगड , नुसते नाव जरी ऐकले तरी उभा राहतो आपल्या डोळ्यांसमोर स्वराज्याचा रोमांचक असा इतिहास.राजगडानंतर स्वराज्याची दुसरी राजधानी असणाऱ्या या किल्ल्याविषयी आपण या लेखात जाणून घेणार आहोत.किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे,किल्ल्यावर कसे जावे याची माहिती पाहूया..

भौगोलिक स्थान -

महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणून ज्याची ओळख आहे अशा कोकणातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांत किल्ले रायगड 350 वर्षांपासून भक्कमपणे इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

रायगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे ८२० मीटर  आहे. हिंदवी स्वराज्याचा इतिहासामध्ये त्याची एक  वेगळी अशी छाप आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगड किल्ल्याचा फायदा भविष्यात कसा होईल हे जाणले होते म्हणूनच त्यांनी राजगड नंतर रायगडाला स्वराज्याची दुसरी राजधानी बनविली.

महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडवरच झाला होता.  सध्या हा किल्ला  महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागात येतो.

राजधानी म्हणून निवड

रायगडाचे जूने नाव ‘रायरी’ असे होते. पूर्वी या ठिकाणी गड नव्हता. त्या ठिकाणी नुसता एक तासीव डोंगर होता. निजामशाहीत मात्र रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी होई. 

रायगडाची उंची आणि भक्कमपणा पाहून  यास  राजधानी बनवावे असे महाराजांना वाटले.तसेच हा प्रदेश शत्रूला अवघड वाटतो आहे आणि त्यात रायगड अधिकच अवघड ठिकाण आहे .

समुद्र किनारपट्टी जवळ असल्याने समुद्रातून मालाची ने-आन करण्यास  हे ठिकाण जवळ आहे ,म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या किल्ल्यास पसंती दिली आणि रायगड किल्ला राजधानीसाठी निवडला.



रायगडावरील पाहण्यासाठी ठिकाणे 

तसे तर इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांना किल्ले फिरण्यासाठी कसलीही देखण्या स्थळांची गरज नसते.कारण या महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यावर महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे हे त्यांना माहीती आहे.पण रायगडावरील प्रत्येक ठिकाण हे पाहण्यासाठी आणि इतिहास अनुभवण्यासाठी सर्वोत्तम आहे.

पाचाडचा राजमाता जिजाबाईंचा वाडा : 

वय वाढल्यामुळे राजमाता जिजाऊंना रायगडावरील थंड हवा मानवत नसल्याने महाराजांनी  पायथ्याशी पाचाड जवळ एक देखणा वाडा बांधला. त्यामध्ये राजमाता राहत असे.त्यांच्या व्यवस्थेसाठी काही माणसांची नेमणूक देखील केली होती.

तेथे एक पायऱ्यांची विहीर, तसेच बसण्यासाठी बनवलेले दगडी आसन खास आहे. त्या विहिरीस ‘तक्क्याची विहीर’ देखील म्हणतात.

खुबलढा बुरूज : 

सुरुवातीला किल्ल्यावर चढायला सुरुवात केली की खुबलढा बुरुज दिसतो.

नाना दरवाजा :

 या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ या नावाने देखील ओळखतात. नाना दरवाजा म्हणजेच लहान दरवाजा. १६७४ मध्ये राज्याभिषेकाचा वेळी  इंग्रजांचा वकील हेन्‍री ऑक्झेंडन याच नाना  दरवाजाने किल्ल्यावर आला होता. 

महादरवाजा :

 महादरवाजा हा रायगडावरील मुख्य दरवाजा आहे. यावर दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत त्याचा अर्थ  म्हणजे किल्ल्याचा आत साक्षात ‘‘विद्या व लक्ष्मी’ नांदत आहे. 



 ७५ फूट  व ६५ फूट उंचं दोन भक्कम बुरुज महादरवाज्याला आहे. तटबंदीमध्ये जी आपल्याला काही भोके ठेवलेली दिसतात त्याला ‘जंग्या’ असे म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी त्यांचा वापर करतात. 

महादरवाजापासून उजवीकडे आणि डावीकडे तटबंदी बांधलेली आहे.

हत्ती तलाव :

रायगडावर पोहचल्यावर महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर एक तलाव दिसतो त्याला हत्ती तलाव म्हणतात. हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी लागणारे पाणी हत्तींना या तलावातून मिळत असे.

गंगासागर तलाव : 

हत्तीतलावापासून जवळच काही अंतर चालत गेल्यास एक तलाव दिसतो तो तलाव म्हणजे गंगासागर तलाव.

 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर उरलेली तीर्थे याच तलावात सोडली . 

स्तंभ : 

दक्षिणेकडे बाजुस दोन उंच मनोरे आहेत त्यास स्तंभ म्हणतात.  पूर्वी हे स्तंभ पाच मजले होते असे म्हणतात.  पण आता त्यांची काही पडझड झाली आहे .त्यावर कोरीव नक्षीकाम आढळते.

पालखी दरवाजा : 

स्तंभांचा अगदी पश्चिमेस काही पायऱ्या  दिसतात. त्या पायऱ्या चढून गेल्यावर एक दरवाजा लागतो तो दरवाजा म्हणजे पालखी दरवाजा.  बालेकिल्ल्यात आपण याच दरवाजाने प्रवेश करतो.

मेणा दरवाजा :

 पालखी दरवाजाने वर गेल्यावर  मेणा दरवाजापर्यंत  जाता येते. उजव्या हातास  सात राण्यांच्या सात महालाचे अवशेष दिसतात . 

राजभवन : 

आपण बालेकिल्ल्याचा आतील भागात  प्रवेश केला की एक प्रशस्त चौथरा दिसतो  तो म्हणजेच महाराजांचे राजभवन.

राजभवन ची एकूण लांबी 86 फूट  व रुंदी 33 फूट इतकी आहे. 

  रत्‍नशाळा :  

स्तंभांच्या पूर्वेकडे  मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्‍नशाळा. एखाद्या मोहिमेची  गुप्त बोलणी करण्यासाठी ही जागा वापरात असेल असे म्हणतात..

राजसभा : 

ज्या पवित्र जागेत महाराजांचा राज्याभिषेक झ़ाला, ती जागा म्हणजेच राजसभा. राजसभेचे सभागृह हे  २२० फूट लांब आणि १२४ फूट रुंद आहे. याठिकाणीच  महाराजांचे बत्तीस मण इतके असलेले सोन्याचे सिंहासन होते. 

नगारखाना : 

महाराजांच्या सिंहसना समोर जे भव्य प्रवेशद्वार दिमाखात उभे आहे तो म्हणजेच नगारखाना. नगारखाना हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. 

नगारखान्यातून काही पायऱ्या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वात उंचीवर पोहचतो.

बाजारपेठ :

 नगारखान्याकडून उतरून गेले की एक मोकळी जागा दिसते तिला  ‘होळीचा माळ’ म्हणतात. जिथे आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा विराजमान आहे. 

महाराज्यांच्या  पुतळ्यासमोर  दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तिला शिवाजी महाराजांचा काळातील बाजारपेठ म्हणतात. यात २२ दुकाने आहेत. 

शिरकाई देऊळ :

गडावर एक छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देवीचे आहे . शिरकाई देवी ही रायगडावरील मुख्य देवता होय. 

जगदीश्वर मंदिर : 



बाजारपेठेतून खालच्या बाजूस गेल्यावर  एक भव्य दिव्य मंदिर दिसते जे महादेवाचे मंदिर आहे त्यालाच जगदीश्वराचे मंदिर असे म्हणतात.  नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती मंदिरासमोर आहे.  मंदिरात प्रवेश केला की भव्य असा सभामंडप आहे. 

महाराजांची समाधी : 



मंदिराचा पूर्वदरवाजापासून थोडे चालत गेले की महाराजांची समाधी आहे.

वाघदरवाजा :

 कुशावर्त तलावाजवळून एक अरुंद जागेतून  उतरत आपण  वाघ दरवाजाकडे  जाऊ शकतो. 

टकमक टोक :



 बाजारपेठ पाहिल्यावर सरळ खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. येथे जवळजवळ 2600 फूट उंच   खोल कडा आहे. 

 या ठिकाणी  वारा प्रचंड असतो तसेच जागाही कमी आहे त्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी . शिवकाळात याठिकाणी गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.

हिरकणी टोक :

 गंगासागर तलावाच्या उजवीकडे पश्चिमेस जी अरुंद वाट दिसते ती आपल्याला हिरकणी टोकाकडे घेऊन जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या आहे. 

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक हा रायगडावर झालेला सर्वात गोड आणि आनंदी प्रसंग होय. कारण राज्याभिषेक हा फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. 



६ जून १६७४ या दिवशी सर्वांच्या साक्षीने  गडावरील राज सभेत  राज्याभिषेक सोहळा साजरा झाला. 

दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो शिवभक्त रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी येतात.

गडावर राहण्यासाठी उत्तम सोय 

जर आपल्याला गडावर राहायचे असेल तर राहण्यासाठी  चांगली सोय आहे. धर्मशाळा,काही लहान मोठ्या खोल्या उपलब्ध आहेत .तसेच ही राहण्याची सोय विनाशुल्क आहे.

गडावर खाण्याची सोय

गडावर जाताना विविध  खाण्याची व  वस्तूंची दुकाने असतात.पण आपण आपल्या आवडीनुसार खाद्यपदार्थ घेऊन गडावर जाऊ शकतो.गडावर खाद्यपदार्थ यांचा कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी.

पाण्याची सोय

गडावर गंगासागर तलाव आपल्याला पिण्याचे पाणी पुरवतात . आपण पिण्याचे पाणी घेऊन जाऊ शकतो.

गडावर जाण्याच्या वाटा

किल्ल्यावर जाण्यासाठी एकूण दोन वाट उपलब्ध आहेत. 

१. पायवाट

२. रोपवे

कसे जावे -

रायगड किल्ला हा महाड पासून  सुमारे २५ किमी अंतरावर आहे. 

त्यामुळे प्रथम आपण पुणे किंवा मुंबईवरून महाड ला जावे .तेथून पुढे रायगड किल्ल्याकडे प्रवास सुरु करावा.

त्यासाठी गूगल मॅप चा वापर आपण करू शकता.

तर अशा प्रकारे आपण दुर्ग दुर्गेश्वर रायगडाची माहिती आपण जाणून घेतली.आयुष्यात एकदा तरी रायगडावर नक्की जावे.

धन्यवाद...

जय शिवराय...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.